आता आपण कुणाच्या नि कश्याच्याच आकंठ-वेडसर प्रेमात पडणं शक्य नाही असं एका टप्प्यावर लक्षात येतं आणि आपण निबर-शहाणपणाकडे काहीशा कष्टानंच पाऊल टाकणार असतो, त्या टप्प्यावर मला शेरलॉक भेटला. प्रश्न आणि उत्तरांची सरमिसळ होते त्या करड्या प्रदेशाच्या सीमेवरतीच तो थांबलेला. समोरच्या वैराण आकर्षक प्रदेशाची कमालीची ओढ वाटत असते, पण पुढे जायचं धैर्य होत नाही. अशात एकदाच कळून जातं, की मागचे बंध कमालीचे चिवट आहेत आणि या आयुष्यात तरी ते आपल्याकडून तुटता तुटायचे नाहीत. मग ते शहाण्या मुलासारखं स्वीकारून तो तिथेच थांबलेला. चिरंजीव होऊन. तळ्या-मळ्याच्या निर्जन काठावर त्याची सोबत झाली नसती, तरच नवल.

Monday, September 29, 2014

बोंबील आणि बॅरल

फक्त शेरलॉकच्या धाग्यावर एकत्रित राहावं म्हणून हे पोस्ट इथे डकवून ठेवते आहे.

पुनरुत्पादनाच्या प्रेरणेनं पुरुष आणि स्त्रिया सर्वसाधारणतः एकमेकांकडे आकर्षित होतात हे खरं. पण पुनरुत्पादन ही लैंगिक संबंधांची एकमात्र प्रेरणा नाही. त्या क्रियेतून मिळणारा आनंद ही एक महत्त्वाची प्रेरणा आहे. स्त्रीच्या योनीत पुरुषाचं लिंग या संभोगप्रकाराखेरीज इतर सर्व मैथुनप्रकार, गर्भनिरोधक साधनं, कायदेशीर गर्भपात, प्राणिसृष्टीतही आढळणारे समलिंगी संबंध या सार्‍यांच्या अस्तित्वातून हेच सिद्ध होतं की पुनरुत्पादन ही लैंगिक संबंधांची एकमात्र प्रेरणा नाही. असं असताना अमुक एका प्रकारचे संबंध / आकर्षण नैसर्गिक आणि बाकी अनैसर्गिक, असं कसं ठरवणार? असं ठरवण्याला कुठलाही ठोस आधार देता येत नाही. एकदा माणूस नैसर्गिक म्हटला की तो जे जे करेल, ते सगळं नैसर्गिकच. अर्थात कोणत्याही नैसर्गिक गोष्टींवर बंधनं नसावीतच असं म्हणणंही धोक्याचं आहे (हिंसेची प्रेरणा नैसर्गिकच आहे). पण एखादी कृती नैसर्गिक आहे की अनैसर्गिक हा त्या गोष्टीची योग्यायोग्यता ठरवण्याचा आधारच नव्हे. ती कृती करण्यामुळे इतर व्यक्तींच्या स्वातंत्र्याचा संकोच होत नाही ना, त्यांच्यावर अन्याय होत नाही ना याची खातरजमा करणं महत्त्वाचं आहे.
समलिंगी संबंधांना दोन व्यक्तींची परस्परसंमती असेल, तर त्यामुळे इतरांवर काय अन्याय संभवतो? कोणताच नाही.
मग त्याला विरोध करण्याला आधार काय?
माणसाच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणत, समलिंगी संबंध बेकायदेशीर ठरवणार्‍या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी निषेध करते.

***

मराठीत फॅनफिक्शन तर नाहीच, दर्जेदार इरॉटिकाही नाही. ’शेरलॉक’ ही ’बीबीसी’ची मालिका आणि मुख्यत्वेकरून तिच्यावर लिहिली जाणारी फॅनफिक्शन यांनी मला फॅनफिक्शन, इरॉटिका या प्रकारांची रसभरित ओळख तर करून दिलीच - पण लैंगिकतेचं विविधांगी भान आणून देण्याला त्यांनी बराच हातभार लावला. त्यातल्या एका शृंगारिकेचं भाषांतर करून हे ऋण थोडंसं फेडायचा मानस बरेच दिवस होता. पण काही केल्या झेपत नव्हतं. मातृभाषेत इरॉटिका, नि चांगली इरॉटिका लिहिणं किती अवघड ते लक्षात येऊन अनेकवार हतबल तेवढं व्हायला होत होतं. ते भाषांतर पुरं व्हायला निमित्त झालं, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचं.
त्याबद्दल भूमिका घेताना काहीतरी सकारात्मक कृतीची जोड त्याला असली पाहिजे असा माझा आग्रह होता. त्यासाठी हे भाषांतर पुरं केलं. दमछाक झाली, पण मजाही आली.
हे थोर भाषांतर नाही, मान्य आहे. पण कुठूनतरी सुरुवात करावी लागतेच.

इथे हे भाषांतर उपलब्ध आहे.

शीर्षकाचा संदर्भ: विलास सारंग यांची ’मुक्त शब्द’च्या २०११ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली कथा.