आता आपण कुणाच्या नि कश्याच्याच आकंठ-वेडसर प्रेमात पडणं शक्य नाही असं एका टप्प्यावर लक्षात येतं आणि आपण निबर-शहाणपणाकडे काहीशा कष्टानंच पाऊल टाकणार असतो, त्या टप्प्यावर मला शेरलॉक भेटला. प्रश्न आणि उत्तरांची सरमिसळ होते त्या करड्या प्रदेशाच्या सीमेवरतीच तो थांबलेला. समोरच्या वैराण आकर्षक प्रदेशाची कमालीची ओढ वाटत असते, पण पुढे जायचं धैर्य होत नाही. अशात एकदाच कळून जातं, की मागचे बंध कमालीचे चिवट आहेत आणि या आयुष्यात तरी ते आपल्याकडून तुटता तुटायचे नाहीत. मग ते शहाण्या मुलासारखं स्वीकारून तो तिथेच थांबलेला. चिरंजीव होऊन. तळ्या-मळ्याच्या निर्जन काठावर त्याची सोबत झाली नसती, तरच नवल.

Saturday, November 28, 2015

मला फॅनफिक्शन का आवडते?

मी साधारणत: ४ वर्षांपासून फॅनफिक्शन वाचते आहे. पण त्याबद्दल मलाच पडणार्‍या प्रश्नांची उत्तरं मात्र अजुनी सापडताहेत.

मला फॅनफिक्शन का आवडते?

मला हे माहीत नव्हतं. अजुनी पूर्णांशानं माहीत नाहीच. 'शरलॉक' अतिशय आवडतं आणि ते अजून मिळवण्याचा एक पर्यायी, दुय्यम मार्ग - हे एक उत्तर. फॅनफिक्शनमध्ये मोकळेपणी, अनेकदा भूमिका म्हणून, अनेक अंगांनी, प्रसंगी चाकोरीच्या बाहेर जाऊन, केलेली सेक्सविषयक अभिव्यक्ती - हे दुसरं उत्तर. फक्त 'शरलॉक'च नव्हे, तर इतरही अनेक प्रकारच्या गोष्टींच्या फॅनडम्समधून जोपासलं जाणारं आधुनिक, स्त्रीवादी, समतावादी, खुलं वातावरण हे तिसरं उत्तर.

पण ही उत्तरं पुरेशी नव्हती, हे माझं मलाही ठाऊक होतं.

निरनिराळ्या भारतीय महाकाव्यांवरच्या कथाकादंबर्‍या, अनेक कथांची माध्यमांतरं, रूपांतरं, प्रीक्वेल्स आणि सीक्वेल्स, स्फूर्तिस्थानं आणि सल्यूट्स... हे सगळं फॅनफिक्शनकडेच निर्देश करणारं आहे हे मला ठाऊक होतं. 'व्यासोच्छिष्टं जगत्‌ सर्वम्‌' आणि 'जगात वर्जिनल असं फार थोडं असतं, तुम्ही तेच कसं सांगता हे महत्त्वाचं' या आशयाच्या वचनांची पाटीही मी भिंतीवर लावून ठेवली होतीच.

तरीही फॅनफिक्शन का आवडते - किंवा तिच्यातलं नक्की काय इतकं आवडतं, हे मला कळत नसे.

परवा कितवीतरी भारी गोष्ट वाचताना एकदम साक्षात्कार झाला.

यात प्रश्न असतो आणि उत्तरही असतं. पण मधला रस्ता पूर्ण मोकळा असतो. मूळ कथानक असतं. आणि त्या कथानकानं दिलेला शेवट असतो. व्यक्तिरेखा असतात. त्यांचे स्वभाव असतात. यांतली कोणतीही आणि कितीही व्हेरिएबल्स (चल एककं) उचलायची आणि त्यांच्यामधला रस्ता आपण तयार करायचा. त्यांत पूर्ण स्वातंत्र्य. रस्ते लांबचे वा जवळचे. चढाचे वा उताराचे. नागमोडी वा हमरस्त्यांसारखे. आडवाटांसारखे वा उड्डाणपुलांसारखे. कसेही. आपले रस्ते. आपली आबोहवा. आपल्याला हवी त्या प्रकारची समीकरणं.

एवीतेवी रस्तेच तर महत्त्वाचे असतात.

मग मला एकदम कोडं सुटल्यासारखं झालं.

अर्थात - हे कोडं सुटलं, तरी त्याची अजुनी उत्तरं असतीलच. हे विसरले, तर मी फॅनफिक्सची हाडाची वाचक कशी काय, ना! 

No comments:

Post a Comment