आता आपण कुणाच्या नि कश्याच्याच आकंठ-वेडसर प्रेमात पडणं शक्य नाही असं एका टप्प्यावर लक्षात येतं आणि आपण निबर-शहाणपणाकडे काहीशा कष्टानंच पाऊल टाकणार असतो, त्या टप्प्यावर मला शेरलॉक भेटला. प्रश्न आणि उत्तरांची सरमिसळ होते त्या करड्या प्रदेशाच्या सीमेवरतीच तो थांबलेला. समोरच्या वैराण आकर्षक प्रदेशाची कमालीची ओढ वाटत असते, पण पुढे जायचं धैर्य होत नाही. अशात एकदाच कळून जातं, की मागचे बंध कमालीचे चिवट आहेत आणि या आयुष्यात तरी ते आपल्याकडून तुटता तुटायचे नाहीत. मग ते शहाण्या मुलासारखं स्वीकारून तो तिथेच थांबलेला. चिरंजीव होऊन. तळ्या-मळ्याच्या निर्जन काठावर त्याची सोबत झाली नसती, तरच नवल.

Monday, December 22, 2014

मेथड ऍक्ट - ०२

मूळ कथा: Method Act, Splix
स्रोत: शेरलॉक, बीबीसी
०१|०२|०३|०४|०५|०६|०७|०८|०९|१०|११|१२|१३|१४|१५|१६|१७|१८|१९|२०


प्रकरण दुसरे
“बेन. बेन!”
“शिट! ९९९ वर कॉल करा कुणीतरी. ताबडतोब!”
“लागला, लागला…”
शरलॉकनं डोळे उघडले, तेव्हा आजूबाजूचा घोळका त्याच्याकडे वाकून बघत होता.
ओके… इंटरेस्टिंग.
“उठला, उठला!”
“लायॅबलिटी म्हणजे - जेरेमी कुठाय? त्याला फोन लावा.”
“मिस्टर कंबरबॅच?”
“बेन?”
शरलॉकनं परत डोळे मिटून घेतले.
“ओह, शिट…”
इंटरेस्टिंग. एकही चेहरा ओळखीचा नाही. शरलॉकनं खोलवर श्वास घेतला. लाकडाच्या ताज्या फळ्यांचा वास. मेकपचा वास. ड्रायक्लीनिंगचा रासायनिक वास. आजूबाजूच्या गर्दीचा एक संमिश्र दर्प. एखाद्या बंद जागेत बराच काळ कोंडून राहिलेल्या माणसांना एक विशिष्ट घामट-कुबट दर्प यायला लागतो, तसला तिखट दर्प. यांतल्या किमान तिघांनी तरी भाजलेलं चिकन, उकडलेले बटाटे आणि लसणीच्या फोडणीतला घेवडा चापला आहे. कुणीतरी एकानं पास्ता सलाड खाल्लं आहे. कुणीतरी फक्त कच्च्या भाज्या. आणि एका गाढवानं सढळ हस्ते चीज घातलेलं सलामी सॅंडविच.
त्या वासांनी शरलॉकला एकदम डचमळलं.
“हात चोळू का त्याचे?”
“नको! त्याला हलवू नका अजिबात. ऍंब्युलन्स बोलावली की नाही?”
“बोलावल्ये हो, बोलावल्ये. येईलच इतक्यात.”
शरलॉकनं परत डोळे उघडले. भुर्या केसांच्या एका बाईनं लगेच पुढे होऊन त्याच्याकडे निरखून पाहिलं.
“अगाई! हलू नकोस. चांगलाच शॉक बसलाय तुला. काय रे? बेन? ऐकू येतंय का, मी काय म्हणत्ये ते?”
“न यायला काय झालं?” शरलॉक डाफरला. “काही धाड भरलेली नाही मला. माझ्या नसांना धक्का लागावा, इतका मोठा शॉक नाही बसलेला. श्रवणेंद्रियं व्यवस्थित शाबूत आहेत.”
त्या बाईनं कळवळून मान हलवली. “असू दे, असू दे. आत्ता वाटेल हं बरं.” मग बाजूला होत तिनं लोकांना मागे सरायची खूण केली. “मागे व्हा. मागे व्हा बघू. किती ती गर्दी! त्याला जरा मोकळा श्वास घेऊ द्या.”
शरलॉकनं परत उठायचा प्रयत्न केला. पण ती बाई कुठली त्याला बसू द्यायला! तिनं त्याला पुन्हा झोपवलं. “अहं, उठू नको अजिबात.”
शरलॉक बुचकळ्यात पडला. आजूबाजूच्या तंगड्यांमधून त्याला त्याचं स्वैपाकघर दिसत होतं. पण मग वळून डावीकडे बघितलं, तर वायरींचं हेऽ एवढं जंजाळ. कॅमेरे आणि शूटिंगची तत्सम उपकरणं. नि वर पाहिल्यावर तर अजूनच गोंधळ. छत गायब. नुसताच काळोख.
थकून तो मागे रेलला नि वर काळोखाकडे नजर लावून बसला, तर डोळ्यांवर एकदम कसलासा प्रकाश पडला. तो सहन न होऊन त्यानं डोळे झाकून घेतले.
“कोण ते वेडझवं? बंद करा तो दिवा!” कुणीतरी परस्पर किंचाळलं.
आता शरलॉक जरा चक्रावला. काही वेळापूर्वीच त्याला हुबेहूब त्याच्या कोटासारखाच कोट घातलेला त्याचा तोतया दिसला होता. बरं, नुसता तोतया नव्हे. चांगला्च घाबरलेला, तपशीलवार, जिवंत तोतया. तेव्हा त्यानं समजूत काढली स्वत:ची, इतकी वर्षं काय मनाला येईल ते खाऊन प्रयोग केलेत शरीरावर. एमडीएमए. मॅस्केलीन, सिलोसायबिन… काही करायचं ठेवलं नाही. त्याचाच परिणाम असणार हा. शॉक बसल्यामुळे त्यांची रिऍक्शन आलेली असणं शक्य आहे. होतात असे भास. चांगले जिवंत, रंगीत भास होतात.
पण आता - आता त्याला तितकीशी खातरी वाटेना. मजा म्हणजे त्याच्या ’जिवलगाच्या भेटी’च्या वेळी त्याला शॉकबिक बसल्याचं आठवतही नव्हतं. काही भाजलंय, दुखलंय, लागलंय… नाव नाही. तो अगदी टुणटुणीत होता. ही नक्कीच भौतिकशास्त्राची अजब करामत…
बहुतेक.
तेवढ्यात आरडाओरडा झाला, “आली, आली! ऍम्ब्युलन्स आली….”
शरलॉकचं विचारचक्र जोरात चालायला लागलं. भौतिकशास्त्राचं मरो. आधी काहीतरी शक्कल लढवून हॉस्पिटलवारी टाळायला हवी. नाहीतर इथून निसटून घरी पोचणं राहिलं बाजूला, आपल्याला बेन कंबरबॅच नावाचा नट समजणारे इथले लोक आपली रवानगी हॉस्पिटलात करतील नि तिथे अडकून पडावं लागेल. नि तो रड्या तोतया - टॉम नावाचा कुणी बॉयफ्रेंड आहे नाही का त्याला? मरो. त्याचं तो बघून घेईल. या नकली ’२२१ बी’मधून आधी सुटलं पाहिजे…
तो एकदम ताडकन उठून बसला. “मी अगदी बरा आहे… काही नाही झालेलं मला.”
एकदम दहाबारा हात पुढे होऊन त्याला चोंबाळू लागले.
“बेन, उठू नकोस. पड बघू. दवाखान्यातले लोक येतायत. आधी त्यांना तपासू देत तुला. मग काय ते बोलू…”
“मी उ-त्त-म-आ-हे!” उठायचा प्रयत्न करत शरलॉक फिस्कारला. पण इतक्या लोकांनी त्याला धरलं होतं, की त्याला काही केल्या जागचं हलता येईना.
“असं काय करतोस? बेशुद्ध पडला होतास तू. पड बघू आधी. मग बरं वाटेल राजा…”
राजा? यक्. आपल्या जगात इतकी बाळबोध बडबड करणारं कुणी असणं शक्यच नाही. हे नक्की एखादं समांतरविश्व असणार.
“मिस्टर कंबरबॅच, आलेच ते लोक.”
न राहवून शरलॉकनं हाक मारली, “जॉन? जॉन!”
“देवा! बघा ना कसं करतोय! त्याला चांगलाच धक्का बसलेला दिसतो…”
“मला का-ही-ही झालेलं नाही!” शरलॉक भडकला. त्याचं डोकं आता वेगात चालू होतं. लोक किती कमालीचे मंद असतात. जरा काही वेगळं घडलं, की ’शॉक - शॉक’ म्हणून बोंबलायला सुरुवात. मूर्ख लेकाचे! पण जॉन गेला कुठे? आत्ता तर इथे होता. हा सिनेमाचा सेटबिट आहे की काय…
या विचारासरशी तो एकदम चमकला. असं कसं शक्य आहे?
त्याच्या मेंदूवर त्याचा ठाम विश्वास होता. मेंदूत काहीही बिघाड झालेला नाही. आपण लख्ख विचार करतो आहोत. काही होत असतं तर आपल्या ताबडतोब लक्षात आलं असतं. डोकं झटकत त्यानं समोरच्या गर्दीवरून एक नजर फिरवली. त्याला थोपटणार्या त्या भुर्या केसांच्या बाईनं त्याचं लक्ष वेधून घेतलं. तिच्या गळ्यात ओळखपत्र नव्हतं, पण आजूबाजूचे लोक तिचा आरडाओरडा बिनबोभाट ऐकून घेत होते. म्हणजे इथले बरेचसे लोक तिच्या हाताखाली काम करत असणार. बारीक कापलेली, पण मळकी नखं. नखांत पॉलीशचा रंग दिसतोय. साधे, पण चटपटीत कपडे. महागडे टेनिस शूज. वेळ पडलीच तर अवजड कामाला हात लावायलाही तिची ना नसणार. अं… दोन मुलं, दोन मांजरं, एक कुत्रा. तूर्तास हॉटेलात मुक्काम आहे, पण त्याला घरपण यावं म्हणून घरून मेणबत्त्या आणलेल्या दिसतायत...
हिच्याशीच बोललं पाहिजे.
एकदा स्वत:शी निर्णय झाला, तशी तो शांतपणे मागे रेलला आणि त्यानं ऍम्ब्युलन्ससोबत आलेल्या लोकांना न्याहाळायला सुरुवात केली. तेवढ्यात त्यातला एक जण भारावलेल्या सुरात त्याला म्हणाला, “मिस्टर कंबरबॅच, घाबरू नका तुम्ही. सगळं नीट होईल बघा… कुठे लागला त्यांना धक्का?”
“त्या हाताला.” कुणीतरी माहिती पुरवली.
थोडक्यात नखशिखान्त तपासणी करून घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. त्याच त्या नेहमीच्या, कंटाळवाण्या तपासण्या. पकाव. शरलॉकनं डोळे मिटून घेतले नि तो त्याच्या ’माइंड पॅलेस’मध्ये१ शिरला. उगाच का त्याला ’जिवलग’ आणि ’समांतर विश्व’ आठवलं होतं? माइंड पॅलेसमध्ये नक्की आणखी काहीतरी सापडेल...
*
डोळ्यांवर पडलेल्या प्रकाशामुळेच त्याला परत खडबडून जाग आली. तो एका बिछान्यावर होता. अंगात फक्त चड्डी. (वेगळाच कुठलातरी ब्रॅण्ड. त्याचा नाही.) छातीला जोडलेल्या वायरी आणि बोटाला ऑक्सिजन मॉनिटरची वायर. शेजारी एक नर्स. सलाइनची तयारी करतेय. दोन बायका - डॉक्टर - आणि एक बाप्या - डॉक्टरांचा मदतनीस - बाजूला उभे. तिघांच्याही चेहर्यावर एकाच यंत्रातून छापून काढल्यासारखा एकच एक चिंताक्रांत भाव.
“रिलॅक्स. तुमच्या नजरेखाली मरायचा माझा अजिबात इरादा नाही.” आवाज भलताच बसलेला आणि खोल येतो आहे की...
यावर एका डॉक्टरणीनं भिवया उंचावल्या. तरीही तिच्या चेहर्यावरची एक रेषादेखील हललेली नाही. नक्की बोटॉक्स घेतलेलं आहे. “मिस्टर कंबरबॅच, तुम्ही अर्धा तास बेशुद्ध होतात. काळजी घ्यायला नको? कसं वाटतंय आता?”
“एकदम झकास. या नळ्या नि वायरी काढून मला ताबडतोब घरी जाऊ दिलंत तर अजून बरं वाटेल.”
“तुम्हांला इथे का आणलंय ते माहीते ना तुम्हांला?”
“माझं नाव-” शरलॉक बोलता बोलता थबकला. तूर्तास तो कुठे का असेना, इथले लोक त्याला बेन कंबरबॅच म्हणून ओळखत होते हे सत्य होतं. अनुभवाची सत्यासत्यता पडताळून बघण्यासाठी वास्तवातल्या वस्तूंचा वापर करून घेण्याची पद्धत तशी जुनीच. धर्माची झेंगटं सोडून दिली एक वेळ, तरी किमान प्लेटोच्या गुहेच्या रूपकापासून चालत आलेली. बरं, ती पद्धत फार चतुर होती अशातला भाग नव्हे. तिच्यात गृहीतकं फार. तरी आधुनिक वैद्यकात ती सररास वापरत. भौतिकशास्त्रातले तूर्तास सिद्ध झालेले नियम आणि वस्तुमानाचं विभाजन विल्येंकिनच्या दुसर्या पातळीनुसार विस्तारून बघायला काय हरकत होती खरं तर? सध्याच्या विश्वाच्या सीमा ओलांडून पलीकडे जाण्याच्या शक्यता होत्या त्यात. मग वास्तवाची अनेक रूपं एकाच वेळी अस्तित्वात असू शकली असती. हजारो बिछान्यांवर पहुडलेले हजारो शरलॉक… काहींमध्ये त्याचं नाव बेन कंबरबॅच असलं असतं…
जोवर निखालस चूक म्हणून सिद्ध होत नाही, तोवर हीदेखील एक शक्यता आहेच. म्हणजे हे कोडं सुटत नाही, तोवर बेन कंबरबॅच म्हणून राहणे आहे...
भानावर येत शरलॉकनं परीटघडीचं एक हसू तोंडावर ताणलं. “केबलला हात लागला होता. मला कितपत लागलंय, ते तपासायला म्हणून मला इथे आणलं आहे तुम्ही. बरोबर ना?”
आता दुसर्या डॉक्टरणीनं स्मित केलं. “बरोबर. तुमची जन्मतारीख सांगा बघू.”
अरे कर्मा...
शरलॉकनं आधी तोंडावरचा मास्क काढला. मग चटकन विषय बदलून ऑक्सिजनच्या तबकडीकडे बोट दाखवत म्हणाला, “काढला तरी चालेल ना आता? बघा ना.. ९६. म्हणजे चांगलाच आहे आता. ना?” मग ठेवणीतलं हसू सफाईदारपणे हसत नजरेत आर्जव आणून त्यानं पहिल्या डॉक्टरणीकडे पाहिलं. तिच्या बिल्ल्यावर तिचं नाव होतं. “अं… डॉ. डेमिल, ना? काढू?”
ती गोंधळून बघतच राहिली. मग भानावर येऊन हसत तिनं त्याच्या हातातला मास्क काढून घेतला. “काढा, चालेल! मिस्टर कंबरबॅच, तुम्ही म्हणताय खरे, केबलला हात लागला म्हणून. पण…” तिचा आवाज गोड होता. बोलण्यात दिसे न दिसेशी स्कॉटीश झाक होती. वावरात थोडी चलबिचल दिसतेय, पण नक्की लग्न झालेलं आहे. आणि लग्नानंतर सुखात नांदत असणार बया. फावल्या वेळात बहुतेक गिटार वाजवते… बोटातली अंगठी थोऽडी घट्ट होतेय. पण अजून नवर्याला सांगून अंगठी मोठी करून घेतलेली नाही. अजून एक हिर्याचं कडं. म्हणजे लग्नाचा वाढदिवस नुकताच झालेला आहे.
“हो, केबललाच लागला.” कसंही करून एक कॉम्प्युटर मिळवला पाहिजे. या जगात तंत्रज्ञान तरी आपल्या जगाइतकंच व्यवस्थित चालतंय. कुणी सांगावं, फक्त ग्लास्गोमध्ये येऊन पडलेले असू आपण. फार काही घोटाळा नसेलही.
“हो ना! भाजल्याची काहीच खूण दिसत नाही. फोडबिड तर सोडाच, साधं लालपण नाही झालेलं.” मदतनीस. याचं नुकतंच ब्रेकअप झालेलं दिसतं आहे. पुरता सावरलेला दिसत नाही गडी, अजून तिचाच शाम्पू नि क्रीम वापरतो आहे! ओह, ती याला सोडून गेलीय! “पण म्हणून काय झालं? आम्ही जरा घाबरलोच होतो. चांगला अर्धा तास बेशुद्ध होतात तुम्ही, मिस्टर कंबरबॅच. इथे आणल्यावरसुद्धा लगेच शुद्ध नाही आली तुम्हांला. किती लागलंय नि किती नाही, कळेना. नि हातावर? साधी खूणही नाही!”
“चांगलंय की मग! निघू मी आता?” इति शरलॉक.
“चाललात कुठे? अजून थोड्या टेस्ट्स व्हायच्यात. हातापायांत काही न्यूरॉपथी-” मग जीभ चावून “बधिरपणा जाणवतोय?” एक नाही – दोन प्रियकर? अहं. दाढी टोचल्याच्या खुणा आहेत... एक नक्की पुरुष. लव्हबाईट. पण इतका छोटा? नक्की दुसरी बाई आहे. डोळ्याच्या कडा लाल. नि हालचाली अशा भिरभिरत्या का आहेत? थ्रीसममुळे असुरक्षित वाटतंय तिला? बाकीचे दोघं मिळून तिच्याकडे दुर्लक्ष करतील अशी भीती? बहुतेक.
“अहं.” शरलॉकनं मुकाट्यानं मुठी वळवून फिरवून दाखवल्या. पाय घोट्यातून फिरवून दाखवले. “अजिबात नाही.”
“तरी थोड्या सेन्सरी टेस्ट्स करायला लागतील आपल्याला. आणि काही न्यूरॉलॉजिकल... हां, तर – जन्मतारीख?”
“अं...” पुन्हा ठेवणीतलं हसू हसत शरलॉकनं विषय बदलला. “मला जरा ’जायचं’ आहे...”
डेमिलबाईंना शरलॉकचा शहाणपणा आवडला नसावा. त्यांनी रोखून बघत म्हटलं, “खरं म्हणजे तुम्ही हालचाल नका करू. मी कॅ-”
“नको हो! कॅथेटरबिथेटर नको. मी जाईन ना…” जोडीला चेहर्यावर एक कसनुसं हसू आणत शरलॉकनं विनवणी केली.
दुसरी डॉक्टरीण लगेच विरघळली. “बरं, जाल ना नीट? ऍलन, त्यांना नेशील का तू जरा?”
तत्परतेनं एक नर्स पुढे झाली.
तिनं शरलॉकच्या अंगाला जोडलेल्या नळ्या काढून टाकल्या नाहीत. पण त्या मॉनिटरपासून सुट्या केल्या. शरलॉकला अंगात चढवायला एक पातळ डगला दिला. रबरी तळवे असलेले मोजे चढवले. एव्हाना आडव्या केळ्याइतकं मोठं नि खोटं हसून शरलॉकचं थोबाड दुखायला लागलं होतं. पण करता काय? हे असं मूर्खासारखं हसणं या लोकांना फारच आवडत होतंसं दिसलं. नाईलाजानं शरलॉकनं अजूनच गोड आवाज काढत म्हटलं, “खरंच, मला अगदी अवघडल्यासारखं होतंय…”
“छे छे! अवघडल्यासारखं काय त्यात! तुम्ही अगदी काऽही वाटून घेऊ नका, मिस्टर कंबरबॅच. उलट - सॉरी म्हणजे… आत्ता विचारायचं मला जिवावरच आलंय. पण - त्याचं काय्ये, माझी मुलगी तुमची फॅन आहे. तुम्ही ऑटोग्राफ द्याल का तुमचा तिच्यासाठी? तुमचा शो किती प्रेमानी बघते माहित्ये ती! खरं म्हणजे तिला फोन करून बोलवणारच होते मी, पण… मी एक फोटो काढू तुमचा पटकन?”
शरलॉक बावळटासारखं तोंड उघडं टाकून तिच्याकडे बघतच राहिला. मग घाईघाईनं त्यानं तोंड मिटलं. “अं - हो. जरूर.” उठता उठता त्यानं नर्सच्या डेस्काकडे नजर टाकली. रिकामं. आणि कॉम्प्युटर. वॉव! आता हिला इथून हाकलायचं कसं? तिच्याकडे एक आपादमस्तक कटाक्ष टाकत त्यानं तिचा विसरलेला मोबाईल हेरला आणि तिला मोबाईलची आठवण करून दिली.
जीभ चावत नर्स उद्गारली, “अय्या, तुम्हांला कसं कळलं? शोचा फारच परिणाम झालेला दिसतोय तुमच्यावर, ना? आलेच मी फोन घेऊन. तुम्ही याल ना जाऊन तोवर?”
“हो. अगदी. या पटकन.” शरलॉक.
“ही गेले नि ही आले. काही व्हायला लागलं तर बेल दाबा. हं?”
तिला परत एकदा खुळचटासारखं हसून दाखवल्यावर ती अंतर्धान पावली. शरलॉकनं घाईघाईनं तिचं डेस्क गाठलं नि कॉम्प्युटरवर एण्टरचं बटण दाबलं. सुदैवानं तो लॉक्ड नव्हता. हॉस्पिटलचं पान उघडायला पासवर्ड लागला असता. पण ब्राउझर तसाच उघडला. त्यानं साळसूदपणे गूगल उघडून नाव लिहिलं.
Benjamin Cumberbatch
८००० रिझल्ट्स. हं. ठीक.
नाव बदलून बघावं का?
Benedict Cumberbatch
ओह. ३७०,००० लाख रिझल्ट्स. वाटलंच, काहीतरी चुकतंय.
त्यानं विकीचं पान उघडलं. विकी. हुह. नाटक. टीव्ही. रेडिओ. सिनेमा. खाजगी तपशील. पकाव. पकाव. फडतूस. हं…, हे थोडं इंट्रेष्टिंग आहे… पकाव. थोबाड बरं आहे. पण केस? बावळट. -
शरलॉक. क्लिक.
ओह.
आता थोडा उलगडा होतो आहे… डॉयल कॅनन. म्हणजे? क्लिक.
ब्लडी हेल! हे पात्र गोष्टीतलं आहे? तेवढ्यात त्या भिकार डगल्याचा मागचा बंद सुटला. आणखी वैतागत शरलॉकनं डगला अंगाभोवती आवळून घेतला. गोष्टीतलं पात्र?
चरफडत त्यानं Sheralock Holmes गूगललं.
८००,००० लाख रिझल्ट्स. बेनेडिक्टहून जास्त आहेत. नाही म्हटलं तरी शरलॉकला थोडं बरं वाटलंच.
एक मिनिट, हा दाढीचे खुंट असलेला माणूस कोण आहे? हापण शरलॉक होम्स? देवा-
“आलातपण तुम्ही? नि माझ्या कॉम्प्युटरवर काय करताय? तुम्हांला -”
डेस्कापासून मागे होत शरलॉकनं चेहर्यावर तेच ते खुळ्यासारखं हसू पाजळलं. “सॉरी, मी जरा ट्विटर बघत होतो. हे मिडियावाली माहित्येत ना तुम्हांला… कधी काय छापून येईल… नेम नसतो हो. फार काळजी घ्यावी लागते.”
यावर ती नर्सही बावळटासारखी हसली. बयेनं आधीच कुठल्यातरी पेपरवाल्यांशी संधान साधलेलं दिसतंय. “ओके ओके. आलं लक्षात. तो फोटो… तुमची काही हरकत नाही ना?”
“छे छे! तुम्हांला कसं नाही म्हणीन! काढा ना.” नर्सबाई मोबाईलमधल्या कॅमेर्याशी झटापट करत होत्या, तोवर शरलॉकचं डोकं वेगानं धावू लागलं होतं. मी इथे आहे, म्हणजे… बेनेडिक्ट...तिथे असणार.
’२२१ बी’मध्ये.
जॉनसोबत.
ते येडं? जॉनसोबत? कापरं भरलंय त्याला आधीच. सिगरेटचं व्यसन. जॉननं त्याचं काय केलं असेल एव्हाना? शरलॉकला कल्पनेनं फिस्सकन हसायला आलं. “वाट लागली त्याची…”
“अं? काय म्हणालात?” नर्सनं न कळून विचारलं.
“चक्. काही नाही. झालं?”
“लाइट्स - कॅमेरा - ऍक्शन!” नर्स खिदळली.
शरलॉकनं कितव्यांदातरी ते दिव्य स्माइल चेहर्यावर ताणून धरलं
*
“तुम्हांला काहीही झालेलं नाही, मिस्टर कंबरबॅच. सिटीस्कॅन नि एमाराय क्लिअर आहेत. कुठे भाजलेलं नाही. हार्ट, लंग्ज, ब्रेन…. सगळं ठणठणीत आहे. खुशाल काम करा. वेर्तेबाईंनी गाडी पाठवलीय तुमच्यासाठी.” डॉ. डेमिल तशा शांतपणे बोलत होत्या. पण मधूनच एखाद्या धास्तावलेल्या कटाक्षातून त्यांच्या मन:स्थितीची चुणूक दिसत होती. काय बावळटासारखी वागायला लागतात शहाणी सुरती प्रसिद्ध नटांच्या तैनातीत. इतकं काय झेपत नाही त्यांना कुणास ठाऊक...
“झकास. थॅंक्यू.” उघडपणे इतकंच म्हणून शरलॉक थांबला.
“खूप बरं वाटलं तुम्हांला भेटून.” देवा, आख्खं हॉस्पिटल त्याला निरोप द्यायला खोलीच्या दारात गोळा झालं होतं नि वर खुळचटासारखं गोड हसत होतं.
“मलापण. बरं वाटलं खूप.” न राहवून शरलॉकनं हातावरच्या घड्याळाकडे नजर टाकली. नऊ वाजले. “निघू मी?”
“इकडून या, साहेब.”
गाडीपाशी पोचेस्तोवर कुजबुजी, कोपरखळ्या, किंकाळ्या सगळं काही यथासांग झालं. एका फोटोग्राफरला खुन्नस देत शरलॉक पुढे होतोय, तोच ती भुर्या केसांची बाई हजर. “चल, तुला हॉटेलवर सोडते.”
“मी काय म्हणतो - आपण सेटवरच जाऊ या…” शरलॉक. ’तिकडून’ ’इकडे’ आलो, म्हणजे मधे कुठेतरी फट पडलेली असणारच… ती सापडेस्तोवर शरलॉकचा इकडे निभाव लागला नसता असं नाही. निभाव न लागायला झालं काय? इथून तिथून लंडन तर तेच आहे... पण तो लाडावलेला-मंदबुद्धी-नट बेनेडिक्ट? तो तिकडे जॉनपाशी जाऊन पोचलाय त्याचं काय? काय काय घोळ घालून ठेवले असतील, कुणास ठाऊक…
घोळ नाहीतर काय...
क्रमश:


No comments:

Post a Comment