आता आपण कुणाच्या नि कश्याच्याच आकंठ-वेडसर प्रेमात पडणं शक्य नाही असं एका टप्प्यावर लक्षात येतं आणि आपण निबर-शहाणपणाकडे काहीशा कष्टानंच पाऊल टाकणार असतो, त्या टप्प्यावर मला शेरलॉक भेटला. प्रश्न आणि उत्तरांची सरमिसळ होते त्या करड्या प्रदेशाच्या सीमेवरतीच तो थांबलेला. समोरच्या वैराण आकर्षक प्रदेशाची कमालीची ओढ वाटत असते, पण पुढे जायचं धैर्य होत नाही. अशात एकदाच कळून जातं, की मागचे बंध कमालीचे चिवट आहेत आणि या आयुष्यात तरी ते आपल्याकडून तुटता तुटायचे नाहीत. मग ते शहाण्या मुलासारखं स्वीकारून तो तिथेच थांबलेला. चिरंजीव होऊन. तळ्या-मळ्याच्या निर्जन काठावर त्याची सोबत झाली नसती, तरच नवल.

Thursday, June 21, 2012

दी ब्लॉग ऑफ युजिनिया वॉटसन: ४


दी ब्लॉग ऑफ युजिनिया वॉटसन: ४
मूळ कथा: The blog of Eugenia Watson, Mad_Lori
स्रोत: शेरलॉक, बीबीसी

आधीची प्रकरणे:
प्रकरण १
प्रकरण २
प्रकरण ३

दी ब्लॉग ऑफ युजिनिया व्ही. वॉटसन, नाइट ऑफ दी गार्टर
१२ सप्टेंबर

जगातली सगळ्यांत आळशी ब्लॉगर आहे मी. स-हा दिवस आणि एक शब्दही लिहिलेला नाही मी. बाबा इतके दिवस कधीही खाडा करत नाही. अर्थात तो करूही शकत नाही म्हणा. त्याचे चाहते चोवीस तास जरी शेरलॉकच्या नवीन साहसावाचून राहिले तरी पुष्कळ झालं म्हणायचं. बाबानं लिहिलं नाही, की ते लगेच त्याच्यामागे लिहायसाठी लकडा लावतात. नाहीतर माझा ब्लॉग. तो कुणीच वाचत नाही. मी सेटिंगच तसं केलं आहे. याला कुणी आत्मकेंद्रितपणाही म्हणेल. पण माझ्या पुढे गाजणार असलेल्या आठवणींचा हा कच्चा मसुदा आहे, असंच म्हणायला मला आवडतं.

सध्या इकडे गडबड चालू होती. आई आठवड्याभरासाठी रशियाला गेली होती. कुठल्याश्या रोमन सम्राटाचा सापळा सापडला होता म्हणे, तो तपासायला. किती वर्षांपूर्वीचा सापळा, तरी अजून चाललंच आहे. मी मात्र जागेपणीचा जवळ जवळ सगळा वेळ लिउनीडकडेच होते. लिउनीड म्हणजे माझा बुद्धिबळाचा शिक्षक. आता माझ्या स्पर्धा जवळ आल्यायत. मला इण्टरनॅशनल मास्टर व्हायचं असेल, तर कामाला लागायला हवंच. ख्रिस्मसनंतर होणार्‍या स्टॉकहोमच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मला बहुधा खेळता येईल, असं चाललंय. बघू, एवढ्यातच उडायला नको.

बाकी सध्या आमच्या स्टेटली वेन जहागिरीत बॅटमन आणि रॉबिन भलतेच प्रेमात आलेत. काय झालंय कुणास ठाऊक. जरा विचित्र दिसतात, पण गोSडही दिसतात. परवा मी स्वैपाकघरात आले, तेव्हा बाबा भांडी घासत होता - शेरलॉक त्याच्या मागे उभा राहिलेला. हात बाबाच्या कमरेवर नि बाबाच्या मानेत खुपसलेलं डोकं. बाबा खिदळतोय. आता या वयाच्या पुरुषांनी खिदळलेलं काय बरं दिसतं का? मी आल्या पावली उलटी फिरले. पण आता दिसलं ते दिसलंच ना? ते कसं पुसणार? 'देवा, हे मी काय बघतेय' असं म्हणते मी या असल्या वेळांना. पण कालच्या रात्रीसारख्याही वेळा असतातच. मी त्या दोघांना झोपायच्या आधी गुडनाईट म्हणायला '२२१'मधे गेले होते. हे दोघं जण एकमेकांच्या अंगावर रेलून टीव्ही बघत बसलेले. शेरलॉकचं डोकं बाबाच्या खांद्यावर. अशा वेळी मला हमखास अगदी मुलींसारखं 'कित्त्ती गोSSSड' असं वाटायला लागतं.

श्श! कुणाला सांगू नका बरं का. मला ओळखतात लोक.

नि आज झॅकचं काहीतरी तिसरंच. त्याला काय झालंय मला कळतंच नाहीय. इथे माझ्या उद्याच्या वाचकांना थोडी पार्श्वभूमी सांगायला हवी.

झॅक माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. मी मुलींच्या शाळेत - फ्रँकाइस, हॉलण्ड - जात असल्यामुळे मला खूप पोरं भेटत नाहीत, पण झॅक समोरच राहतो नि त्यामुळे आम्ही प्राथमिक शाळेत असल्यापासून आमची मैत्री आहे. आम्ही साधारण आठ वर्षांचे असताना तो नि त्याचे आईबाबा इथे राहायला आले. तुमचा विश्वास बसणार नाही. पण तो सरळ इकडे आला, आमचं दार वाजवलं नि विचारलं की इकडे खेळायला कुणी लहान मुलं आहेत का? त्यावर शेरलॉकनं काय करावं? त्याला सांगितलं, 'जा, तिकडे गल्लीच्या कोपर्‍यावर उभा राहा नि ओरड मोठ्यांदा - कुणी खेळायला मिळेल का - बघ काय होतं ते.' नशिबानं असलं काही करायच्या आत बाबानं काय चाललंय ते ऐकलं नि त्यानं झॅकला '२१९'मधे बोलावलं. मला भेटायला. सुरुवातीला मला तो एक नंबरचा झंपट मुलगा वाटला. तसा तो झंपटच निघाला, पण मग त्याची सवय झाली नि आमची मैत्रीही झाली.

आज शाळा सुटल्यावर नेहमीप्रमाणे मला झॅक भेटला. माझी शाळा घरापासून जवळच आहे. मी जेवायलाही घरी येऊ शकते, इतकी जवळ. कधी कधी आमच्या घरी इतक्या इतक्या भारी गोष्टी चाललेल्या असतात, की मला कुणीतरी घराबाहेर हाकलेपर्यंत मी घरीच रेंगाळते. तर ते असो. झॅकची शाळा पुढे साधारण मैलावर आहे. तोपण चालतच येतो. तो माझ्या शाळेबाहेर माझ्यासाठी थांबतो नि मग आम्ही एकदम घरी येतो. मी फँकाईसमधे जायला लागल्यापासून, म्हणजे मी बारा वर्षांची असल्यापासून, आम्ही नेहमी एकत्रच येतो.

मेट्सीच्या मते झॅक माझ्या प्रेमात पडलाय. माझ्या मते मेट्सीचं डोकं तपासून घ्यायला हवंय. कारण तिला सगळीच मुलं प्रेमात पडलेली आहेत असंच वाटत असतं. एकतर माझ्या तरी नाहीतर तिच्या तरी. नि त्यात तो नि मी इतका वेळ एकत्र असतो म्हटल्यावर तर झालंच. आमची नुसती मैत्री असू शकेल नि आम्हांला एकत्र टाईमपास करायला आवडतही असू शकेल, असं काही तिला वाटत नाही. बाकी झॅक खर्रच माझ्या प्रेमात पडला, तर मला काय वाटेल कोण जाणे. म्हणजे, तो तसा चांगला आहे. फुटबॉल खेळतो, पोहायला जातो. फिट वगैरे आहे. नि त्याला चिक्कार गर्लफ्रेंड्सही आहेत. महिनाभरापेक्षा जास्त एकही टिकत नाही, ते सोडा.

असो. तर आज काय झालं - मी शाळेतून बाहेर पडले नि तो मला भेटला. म्हणाला, "तर - जिनी."

"चल, झॅक."  नि आम्ही बेकर स्ट्रीटकडे चालायला लागलो.

"मग? तुलापण बोलावलंय म्हणे पॉल स्टार्कीच्या पार्टीला. वीकेण्डला."

"हम्म. मीच काय, आमच्या अर्ध्या वर्गालापण बोलावलंय."

"मग? जाणारेस तू?"

"हम्म. बहुतेक. पॉल स्टार्की जरा आगाऊच आहे. पण ती सगळी मंडळी भेटली नाहीयेत मला खूप दिवसांत."

"हम्म..." मग वाक्य अर्ध्यात सोडून तो थांबला. अडखळत म्हणाला, "मग आपण सोबत जाऊ... म्हणजे... कारपूल वगैरेसारखं काहीतरी. म्हणजे खूप काही कार्यक्रम असं नाही. असंच - पार्टीला जाऊ. तू नि मी... थोडं काहीतरी खाऊ या...वगैरे?"

तो जरा विचित्रच वागत होता. "हं? ओके, चालेल ना. मेट्सी नि ब्रिनपण येणारेत. नि ब्रिनचा बॉयफ्रेंडपण. आपण सगळेच मावू तुझ्या आईच्या गाडीत." आता हे आठवताना माझ्या लक्षात येतंय, मी व्यवस्थित गाढवपणा केलाय.

मग तो एकदम उचकल्यासारखंच करायला लागला. धड काही बोलेचना. "त्यांच्याबरोबर जायचंय का तुला? ओके. मी असं नव्हतो म्हणत - मरो, मी जाणारपण नाही कदाचित. सोड." नि तो इतका भरभर चालत सुटला की मला जवळजवळ धावायला लागलं. मग घरी येईपर्यंत काही बोलणं झालंच नाही.

आता हे जर का त्याचं मला 'विचारणं' असेल, तर त्यानंही नीटच माती खाल्लेली आहे.

असो. महत्त्वाची गोष्ट. ज्याबद्दल लिहायला म्हणून मी इथे बसलेय. देवा, मी मुद्द्यावर यायला कधी शिकणार कोण जाणे.

तर - मी माझा बुद्धिबळाचा डाव मांडून बसले होते, तेव्हा बाबा डोकावला. "बाहेर जाऊ या," तो म्हणाला. त्याचे डोळे चमकत होते. मी ताबडतोब उठून कोट घेतला नि आम्ही निघालोच.

आम्ही असं बरेचदा करतो. मी नि बाबा. दर चारेक दिवसांनी तो येतो नि 'चल, चक्कर मारून येऊ या' वगैरे काहीतरी म्हणतो. की आम्ही निघालोच भटकायला. बागेत जातो. नाहीतर एखादं आईसक्रीम किंवा कॉफी. किंवा मग चोरबाजारात. मला प्रचंड आवडतात तिथली दुकानं. मला आमची ही चक्कर खूप आवडते. घर, आई, शेरलॉक, बुद्धिबळ, गृहपाठ, गुन्ह्यांचा तपास, हाडकं... सगळ्यापासून लांब. आमचे आम्हीच. आमच्या या असल्या भटकंतीमधेच मला बरेचदा बाबा खराखुरा भेटला आहे. मनापासून बोलला आहे. मी नि आई एकतर सकाळी नाश्त्याला म्हणून बाहेर पडतो, नाहीतर रात्री टीव्ही बघताना तरी गप्पा मारतो. शेरलॉकबरोबर गप्पा होतात त्या कॅबमधून असंच कामाशिवाय भटकताना. किंवा बुद्धिबळाचा डाव नुसताच समोर मांडून. पण मी नि बाबा मात्र असे मधून मधून बाहेर सटकतो.

आज नुसतेच भटकायला गेलो रीजण्ट्स पार्कमधे. ते अगदी कोपर्‍यावरच आहे. आम्ही बरेचदा तिकडे जातो. "आज जेवायला नको बाहेर, तुझी आई स्वैपाक करणार आहे," इति बाबा.

"हं. मस्त," त्याच्या हातात हात अडकवत मी म्हटलं. "मला इतकी भूक लागलीय की समोर प्यादी तरंगताना दिसायला लागलेली मला."

"मला बुद्धिबळातलं थोडं कळत असतं तर बरं झालं असतं ना? तसं मला थोडंफार कळतं, तुला खेळताना बघून बघून. पण ते तितपतच."

"तू बघायला येतोस ना? तेच आवडतं मला."

"मी येईनच गं."

मग आम्ही नुसतेच शांतपणे रेंगाळत राहिलो. मग त्याला म्हटलं, "बाबा, तुला एक विचारू? थोडं सिरियस आहे."

"विचार ना. बसायचं का आपण?"

"हं, चालेल." एका बाकावर मी मांडी ठोकली. नि विचारलं, "बाबा, आईनं परत लग्न का नाही केलं?"

बाबा थोडा चकित झाला असावा. "हे का बरं मधेच?"

"माहीत नाही. असंच डोक्यात आलं. म्हणजे... ती कुणाबरोबर बाहेरपण जात नाही, बाबा. अजिबात."

"हम्म. नाही जात खरी."

"काय हरकत आहे तिला जायला? किती सुंदर दिसते ती. या वयातपण."

बाबा हसला. "शेवटचं वाक्य तिला सांगायला नको!"

"तिलाच जायचं नसणार. पण का? मला कळतच नाही. याला काय अर्थ आहे? तुला शेरलॉक आहे. पण तिला? ती - एकटी आहे, बाबा. मला अगदी आवडत नाही हे."

"ती एकटी नाहीय. तू आहेस की तिला. मी आहे. नि शेरलॉकपण आहेच."

"बाबा, मी तसं म्हणत नाहीये आणि हे तुलापण माहितेय."

बाबा परत हसला. "जिनी, मी नि शेरलॉक कधी डेटवर नाही गेलो." मग तो शांत बसला. चेहर्‍यावर विनोदी भाव.

"काय झालं बाबा?"

"काही नाही. शेरलॉकबरोबर डेटवर गेलो तर कसं वाटेल, त्याचा विचार करत होतो. छे! नाही कल्पना करता येत. ते असो. मी म्हणतोय, आमचं वेगळं होतं. तो आधीपासूनच आमच्या आयुष्यात होताच. फक्त..." बोलता बोलता बाबा गप्प झाला. "असो. मी म्हणणार होतो, आमच्या बाबतीत गोष्टी सहज घडल्या. पण नाही, तसं नाहीय ते."

"मला तर सहजच दिसतंय सगळं."

"तुला असं वाटतंय ते बरंच आहे. आम्ही सगळ्यांनी तसं ठरवलंच होतं. तुझ्या आयुष्यात शक्यतो ढवळाढवळ होता कामा नये. पण... आपण भरकटलो. तू आईबद्दल विचारत होतीस."

बरोबर, पण हे जे काही चाललं होतं, ते जास्त इंट्रेस्टिंग होतं. पण मी फार मागे न लागता सोडून दिलं. मी सात वर्षांची असताना हे जे काही आमच्या कुटुंबात घडलेलं असेल, त्याबद्दल बोलायला बसलं तर इतकी लहानशी चक्कर पुरणार नाही बहुतेक. "बाबा, ती माझ्यामुळे एकटी राहतेय, असं मला व्हायला नकोय." मी म्हटलं.

"नाही, त्यामुळे नाही. नक्की." ’तुला वाटतंय तसं नाहीये’ असं सगळेच जण कुणाचीही समजूत घालताना म्हणतात. पण बाबाच्या शब्दांत त्यापलीकडची खातरी होती. जणू आईच्या एकटं असण्यामागचं खरं कारण त्याला माहीत होतं आणि ते मी म्हणतेय ते नव्हतं, नि म्हणून तो शांतपणे मला समजावत होता.

बाबाकडे रोखून बघत मी विचारलं, "बाबा, तू काहीतरी लपवतोयस माझ्यापासून."

माझ्या नजरेला नजर भिडवत त्यानं सुस्कारा सोडला. "काही गोष्टी सांगणं माझ्या हातातलं नाही, पिल्ल्या."

"तुझं प्रेम होतं तिच्यावर. ना?" त्याच्यावर रेलत, पण नजर बागेकडे टाकत मी त्याला विचारलं.

माझा हात हातात घेऊन बाबा म्हणाला, "हो. खूप. अजूनही आहे."

"पण तू तिच्या प्रेमात 'पडला' नाहीयेस. ना?"

बाबाला हसू फुटलं. "हे असले क्रियापदांचे फरक फार फार तर सिनेमात महत्त्वाचे ठरत असतील." मग माझ्याकडे वळून म्हणाला, "तू आता मोठी झालीस. ना? तुला कळेल कदाचित, एका वेळी एकापेक्षा जास्त लोकांवर प्रेम करणं शक्य असतं. पण कधीतरी निवड करण्याची वेळ येते. तेव्हा किती दुखतं, ते कळायची वेळ तुझ्यावर कधीही येऊ नये."

"तू त्याची निवड केलीस."

बाबानं आवंढा गिळला. "इतकं सोपं नव्हतं. मी... सोड. तुला वाटतंय तितकं सोपं नाही गेलं मला."

एकदम माझ्या डोक्यात आलं, "बाबा... ती... ती तुझ्यासाठी झुरत बसलीय? म्हणून कुणासोबत जात नसेल ती डेटवर?"

बाबा माझ्याकडे बघत राहिला. समोर सुरुंगांचं मैदान असावं नि पाऊल टाकण्यापूर्वी समोरचा प्रत्येक दगड काळजीपूर्वक निरखून बघावा तसा. "अहं. झुरत नाहीय ती. माझ्यासाठी तर नाहीच."

"मला नेहमी असं वाटतं बाबा, की आईच्या आयुष्यात कुणाची तरी जागा रिकामी आहे. पण ती कधीच त्याबद्दल बोलत नाही. आहे का कुणी असं? तिला..." मला एकदम खूप प्रश्न पडले. "बाबा, ती..."

बाबानं मला हातानं थांबवलं. "हे सगळं तू तिला विचारायला हवंस, राणी. मी तिच्याबद्दल कसं सांगू? ती - तुला वाटतंय त्याहून गुंतागुंतीचं आहे हे सगळं. पण मी एक सांगू शकतो तुला. आमचं जुळलं, कारण आमच्यात काही गोष्टी सारख्याच होत्या. आम्हांला त्या दिसल्या, कळल्या. आम्ही समजून घेतल्या."

काय म्हणायचं होतं त्याला? त्याच्या डोळ्यांत बघत मी विचारलं, "बाबा, तुला वाईट तरी वाटलंय का कधी? लग्न मोडायला नको होतं, असं वाटलंय कधी?"

बाबा चपापलेला दिसला. म्हणाला, "तुला तसं व्हायला हवं होतं, जिनी?"

"मला? बाबा... प्लीज, काळजी नको करूस. ’घटस्फोटित पालकांचं पुनर्मीलन व्हावं म्हणून झुरणारं मूल’ नाहीये मी. मला असं कधी वाटलं असेलच, तर तिथून पुष्कळ पुढे आलेय मी."

"ओह, मग ठीक आहे. मला नाही वाईट वाटलेलं कधी. खरंच, अजून काय हवं असणार मला? तुझी आई नि मी अजूनही चांगले मित्र आहोत. तुझे पालक म्हणून एकत्र असू शकतो. तुझा ताबा कुणाकडे नि तुला कधी भेटायला मिळेल, असले प्रश्न सोडवत बसायला लागत नाहीत. लग्न मोडलं नसतं, तरी जितकी भेटली असतीस; तितकीच हवी तेव्हा, हवी तेवढी भेटतेस."

"नि तुला तुझ्या जिवलगाबरोबर असताही येतं?" ही माझ्यातली हरखून गेलेली टीन-एजर मुलगी!

बाबानं वैतागून मान हलवली. "देवा! कृपा करून हे शेरलॉकच्या पुढ्यात बोलू नकोस. माझी किती मस्करी करेल तो, तुला कल्पनाही करता यायची नाही. हे जिवलग वगैरे प्रकरण... त्याचा विश्वास नाही असल्या कशावर."

"तुझा आहे?"

बाबा विचारात पडला. "जिनी, नीट ऐक. हे महत्त्वाचं आहे. प्रत्येकासाठी असा कुणी एकच एक माणूस नसतो. ’केवळ आपल्यासाठी बनलेलं’ कुणीतरी, स्वप्नातला राजकुमार, देवानं मारलेल्या गाठी... ज्याच्या प्रेमाशिवाय आपण अपुरे असतो, असं कुणीतरी... असं काही नसतंच. प्रेम काही शोधात येत नाही तुमच्या. किंवा अलगद मांडीवर येऊन पडतही नाही. ते आपण आपल्या माणसासोबत घडवायचं असतं," माझा हात दाबत बाबा म्हणाला. "तुझी आई भेटली, तेव्हा तिच्यासोबत ते बांधता येईल असं वाटलं, बांधावंसं वाटलं. पण तेव्हा कळलं नाही - कदाचित मीच डोळे मिटून घेतले असतील - की मी माझी निवड आधीच करून मोकळा झालो होतो. कधी वाटतं, ती तरी मी केली होती का? मग कुणी केली होती? कुणास ठाऊक."

"सांगितलं ना, नशीब."

बाबानं खांदे उडवले. "तुला तसं वाटत असेल तर तसं. तुला माहितीय, तुझ्या आईसोबत डेटिंग करायचो ना मी, तेव्हा तिला सांगितलं होतं मी - शेरलॉक माझा मित्र आहे की नाही, ते मला ठाऊक नाही. पण त्याच्याखेरीज मी असू शकत नाही. जगण्यासाठी जसं खावं, प्यावं, झोपावं लागतं, श्वास घ्यावा लागतो; तसं मला एका वेडसर कन्सल्टिंग डिटेक्टिव्हला सहन करावं लागतं. अर्थात तेव्हा हे रोमॅंटिकपणे नव्हतं म्हटलं मी, असंच म्हटलं होतं. पण अजूनही ते खरंच आहे."

"पण आता त्यात तुमच्या जवळिकीची भर."

बाबा हसत सुटला, अगदी चेहरा लाल होईस्तोवर. "आता नोकरीचे तोटे असतात, तसे फायदेही असतात, नाही का?" मला जवळ घेऊन माझ्या खांद्यावर हात टाकत म्हणाला, "आज हे सगळं प्रेमाबिमाबद्दल का बरं? आपल्याला असलेच काही प्रश्न पडलेत का? झॅक महाशयांनी अखेर इरादे बोलून दाखवले की काय?"

मी बाबाला त्या प्रदेशात फिरकू द्यायला बसलेय! "छे! असाच आईचा विचार करत होते."

"तू तिलाच का नाही विचारत?"

"विचारीन. पण असल्या गोष्टी तुझ्याकडूनच कळायची शक्यता जास्त. आई बोलत नाही फारशी."

"हम्म. नाही बोलत खरी. वैयक्तिक बाबतीत तर नाहीच."

बाबानं सांगितलेल्या काही गोष्टी जरा त्रासदायकच होत्या. "बाबा, आत्ता तू शेरलॉकबद्दल असं बोलत होतास आत्ता, जसं तू काही ठरवलंच नाहीस. गोष्टी आपोआप घडत गेल्या तुमच्या बाबतीत. म्हणजे - मला असं विचारायचंय... तू... तुझं प्रेम आहे ना त्याच्यावर?" बाबा डोळे बारीक करून माझ्याकडे बघत राहिला. मी म्हटलं, "ओके, मला दिसतंय तुला काय वाटतंय ते. सगळ्याच मुलांना वाटत असतं, आपल्या आई-बाबांनी कायम एकत्र राहावं. मी वेगळी कुठून असणार? मलापण वाटतंच तसं. फक्त माझ्या डोक्यात तू नि शेरलॉक असता. आईची नि तुझी काळजी करायला, तिला नि तुला मी एकत्र पाहिलंच कुठे आहे?  बाबा, तू नि शेरलॉक नाही ना वेगळे होणार कधी? मला माहितीय, मी अती करतेय, पण तरी सांग."

बाबा हसायला लागला. "मला जगायला गरज पडते त्याची, विसरलीस? श्वास घेणं थांबवू शकतो का मी? मग त्याला तरी कसं सोडू शकीन?"

"पण तुला तसं करावंसं वाटत नाहीये, ना?"

"नाही, मला तसं करावंसं वाटत नाहीये." बाकावरून उठत त्यानं मला हात दिला. आम्ही उठून चालायला लागलो, तरी तो थोडा वेळ शांतच होता. "असं उत्तर नको आहे तुला, मला कळतंय," माझ्या खांद्यावर हात टाकत तो म्हणाला, "फक्त... शेरलॉकबद्दल मला काय वाटतं ते मला शब्दांत कधीच नीटसं मांडता येत नाही, इतकंच."

मला हसायला आलं. हेच शब्द पुरेसे होते हे त्याला ठाऊक नसेल?

क्रमशः

***
- भाषांतरासाठी लेखिकेची संमती आहे. तरीही यातल्या सगळ्या बलस्थानांचं श्रेय लेखिकेचं आहे आणि मर्यादांचं वा चुकांचं अपश्रेय माझं आहे, हे इथं नमूद करते.
- हे भाषांतर AO3 (Archive Of Our Own) वर इथे पाहता येईल आणि ’ऐसी अक्षरे’वर इथे पाहता येईल.

1 comment: